ऑस्कर पुरस्कार प्राप्त ख्यातनाम गीतकार, कवी, दिग्दर्शक गुलजार साहेबांनी एक पत्र लिहिलं. त्यातल्या दोन ओळी अशा होत्या-
‘A full magazine of poetry in itself is a great achievement. … May I subscribe for the magazine’
गुलजार साहेबांच्या ह्या दोनओळी होत्या ‘कविता-रती’ ह्या मराठी द्वैमासिकाबद्दल. आणि ते पत्र लिहिलं होतं ’कविता-रती’ चे संपादक प्रा. पुरुषोत्तम पाटील ह्यांना.
’कविता-रती’चा वर्गणीदार मला होता येईल का? हे गुलजार साहेबाचं विचारणं म्हणजेच ’कविता-रती’ ह्या वाङ्मयीन नियतकालिक चालविणे हीच खरं तर फार मोठी जोखिम आहे. त्यातही केवळ कवितेला वाहिलेले नियतकालिक नेटाने सुरू ठेवणे ही गोष्ट आणखी कठीण. प्रकाशनाचा कालावधी थोडा मागेपुढे होत असला तरी त्यातले सातत्य टिकवून ठेवणे सोपे नाही. सतीचा वसा घेतल्यासारखे हे व्रत आहे. अशा व्रतस्थपणे गेली पंचवीस वर्षे ‘कविता-रती’चे अंक धुळ्यावरुन निघताहेत आणि ह्या द्वैमासिकाचे संपादक, मुद्रक, प्रकाशक आहेत कविवर्य पुरुषोत्तम पाटील. कवितेचा आणि पर्यायाने मानवी जीवनातला ‘अर्थ’ कायम रहावा म्हणून ’कविता-रती’ चे अर्थशास्त्र कु्ठल्याही शासकीय
अनुदानाच्या कुबड्याविना आपल्या निवृत्त खांद्यांवर त्यांनी समर्थपणे पेलले. काट्याकुट्याची वाट वारंवार साफसुफ करीत तिला राजमार्गाचे वैभव प्राप्त करून दिले. मरा्ठी कवितेच्या इतिहासाला ही नोंद विसरता येणार नाही. मरा्ठी कविता त्यांची कायम ऋणी आहे. कृतज्ञ आहे.
खानदेशाला तशी साहित्याची समृद्ध परंपरा आहे.जीवनाचे रोकडे तत्वज्ञान सांगणार्या बहिणाबाई चौधरी खानदेशातल्याच. ‘काव्य रत्नावली’ नावाचे मासिक ४८ वर्षे नेटाने चालविणारे नानासाहेब फडणीस आपल्या जळगावचे.मराठी नवकवितेचे जनक असलेल्या कविवर्य बा. सी. मर्ढेकरांचा जन्म खानदेशातल्या फैजपूरचा. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले ते धुळ्याला. मर्ढेकरांची दैवत असलेल्या बालकवींनी आपली पहिली कविता लिहिली ती
खानदेशातील नवापूरला.
अशी समृद्ध वाङ्मयीन परंपरा लाभलेल्या खानदेशातील धुळे हे तसे आडवळणाचे गाव. अवतीभवतीच्या परिसर तसा आदिवासी बहुल लोकसंख्येचा. अशा ठिकाणाहून १९८५ ला ’कविता-रती’ हे मराठी कवितेला वाहिलेले द्वैमासिक काढले
ते पुरुषोत्तम पाटील यांनी. आणि ते पुढे अत्यंत जिद्दीने चालविलेही. वाङ्मयीन नियतकालिकांच्या दृष्टीने तो कालखंड तिशय खडतर होता. १९८४ ला ‘सत्यकथा’ नुकतेच बंद पडले होते. पुढे १९९० ला ‘अभिरुची’ आणि ९२-९३ च्या सुमारास ‘समुचित’ चे प्रकाशन थांबले. ’अस्मितादर्श’चा अपवाद वगळता जवळपास महत्वाच्या वाङ्मयीन नियतकालिकांचे अवतार कार्य संपुष्टात आलेले होते. या कालखंडात ‘कविता रती’ ला जिवंत ठेवले ते पुरुषोत्तम पाटील यांच्या संयमी ध्येयनिष्ठेने. महाराष्ट्रातल्या खेड्या-पाड्यातल्या नव्या-जुन्या पिढीच्या कवितांचे स्वागत केले ते ’कविता-
रती’ने. आणि त्याचे अधिष्ठान होते पुरुषोत्तम पाटील यांचे साक्षेपी आणि अनाग्रही संपादन.
२०१० हे ‘कविता-रती’चे रौप्यमहोत्सवी वर्ष.बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी ३० नोव्हेंबर १९८५ ला ‘कविता-रती’चा पहिला अंक प्रकाशित झाला.३० नोव्हेंबर हा कै.कविवर्य बा.भ.बोरकरांचा जन्मदिवस.कविवर्य बा.भ.बोरकरांचे लेखनिक म्हणून काम करताना पुरुषोत्तम पाटील ह्यांना बोरकरांचा सहवास लाभला.काव्य-शास्त्र-विनोदात या गुरू-शिष्यांच्या अनेक रात्री रंगल्या. काव्यचर्चेत अनेक दिवस झिंगले.बोरकरांच्या सौंदर्यवादी सानिध्यात पुरुषोत्तम पाटील ह्यांची काव्य विषयक जाण
अधिक परिपक्व होत गेली. कवितेच्या अमृताचं हे दान पाटीलांच्या दोन हातांच्या ओंजळीत सामावणार नव्हतं. ते संपूर्ण महाराष्ट्राच्या भव्य ओंजळीत घालण्यासाठी ते उचंबळून येत होतं. उतराई होऊ बघत होतं. आणि त्यातून जन्म झाला
‘कविता-रती’चा. कै. कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या स्मरणार्थ काव्य, काव्यविचार, काव्य समीक्षा व कविविमर्श यांनाच केवळ वाहिलेले द्वैमासिक म्हणजे ’कविता रती’. मराठी कवितेच्या इतिहासात इतकी एकनिष्ठ आणि एवढी सर्वश्रेष्ठ कृतज्ञता शोधूनही सापडणार नाही. प्रत्येक नवी पिढी ही अगोदरच्या पिढीच्या खांद्यावर उभी असल्याने तिला अधिक उंची प्राप्त होते. हे कोणत्याही नव्या पिढीने विसरता कामा नये. ही श्रद्धाच मानवी जीवनाला अधिक सुंदर करीत असते. काव्यसौंदर्य प्रकट करणारे ते गर्भगृह असते. परंपरेची नाळ अशीच मागे मागे जोडल्या जात असते. आणि पुढे पुढे वाढतही असते. ‘कविता रती’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
परवा ३० नोव्हें. २०१० ला ‘कविता रती’चा रौप्य महोत्सवी अंक बा. भ. बोरकर विशेषांक म्हणून प्रकाशित झाला. या अंकाला अर्थ सहाय्य करण्यासाठी संपादकांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण महाराष्ट्रातून जो प्रतिसाद मिळाला तो भारावून
टाकणारा आहे. नव्या पिढीतल्या अनेक कवींनी आपल्या पुरस्काराच्या रकमा कृतज्ञतानिधी म्हणून या सत्कार्याला दान केल्या. आणि सिद्ध केले की, या पिढीलाही कृतज्ञतेची जाण आहे. आणि आपल्या इतिहासदत्त कर्तृत्वाचे भानही आहे.
‘कविता रती’च्या वाङ्मयीन योगदानाचा लेखाजोखा पुढीलप्रमाणे मांडता येईल. गेल्या पंचवीस वर्षात ‘कविता रती’ने १३० अंक प्रकाशित केले. यापैकी काही दिवाळी अंक हे विशेषांक म्हणून प्रकाशित केलेले आहेत. त्यात प्रामुख्याने कुसुमाग्रज, कांत, इंदिरा संत, बालकवी, ज्ञानेश्वरी, काव्यचर्चा, विंदा करंदीकर, म. सु. पाटील, मर्ढेकर आणि आता बा. भ.
बोरकर यांच्या वरील विशेषांकाचा समावेश आहे. ५७५ कवींच्या २८८७ कविता गेल्या पंचवीस वर्षांत ‘कविता रती’ मधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. काव्यांची रसग्रहणे, आस्वाद, समीक्षा, मर्मग्रहणे, काव्य चर्चा, संपादकीय इत्यादी अंगांनी कवितेला व्यक्त करणार्या मजकुराची ६००० हून अधिक पृष्ठे अभ्यासकांना उपलब्ध करून देणार्या ‘कविता रती’ बद्दल
मराठी रसिकांच्या मनात आदराचे स्थान आहे.
‘कविता ही बहुरुपिणी आहे’ हे ब्रीद मनात जपत पुरुषोत्तम पाटीलांनी ‘कविता रती’चे संपादन केले. नावीन्याचा हव्यास,विशिष्ट प्रकारची बांधिलकी,आदिवासी, ग्रामीण, महानगरी, मुक्तछंद वृत्तबद्ध अशी कु्ठलीच कुंपणे न मानता गेल्या चार-
पाच पिढ्यांच्या उत्तमोत्तम कविता ‘कविता रती’ ने प्रकाशित केल्या. त्यामुळे मराठी कवितेच्या मुख्यधारेचे पात्र अधिक विशाल आणि व्यापक झाले. अमुक अमुक प्रकारची म्हणजेच कविता असे साचे जे गेल्या काही वर्षात रूढ होऊ पाहत होते
ते विधायक जबाबदारीने ‘कविता रती’ने मोडून काढले आणि त्यावर उत्तम संस्कारही केले.
रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ‘कविता रती’ चा इंटरनेट ब्लॉगही सुरू करण्यात आला आहे. आता जगाच्या कोण्याही कोपर्यातून मराठी कवितेवर प्रेम करणार्या माणसाला ‘कविता रती’ चे अंक वाचता येतील, अभ्यासता येतील. संगणक, इ-बुक रिडर, आणि मोबाईल हँडसेट मध्ये सुद्धा कविता रती’ चे अंक डिजिटल स्वरूपात संग्रही ठेवता येतील. एवढा
अनमोल ठेवा आपल्या हवाली करणार्या त्र्यांशी वर्षाच्या पुरुषोत्तम पाटील ह्यांचे आपण तमाम मराठी रसिकांच्या वतीने अभिष्टचिंतन करूया. आणि ’कविता रती’ च्या रौप्य महोत्सवी काव्ययात्रेला शुभेच्छा देऊया त्याही गुलजारजींच्या शब्दात-
‘हर मोड पे मैने नज्म खडी कर रखी है!
थक जाओ अगर-
और तुम्हे जरुरत पड जाये,
इक नज्म की उँगली थाम के वापस आ जाना!’’
– श्रीकृष्ण राऊत