चांगल्या कवितेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतून प्रा. पुरुषोत्तम पाटील ऊर्फ ‘पुपा’यांनी सुरू केलेल्या ‘ कविता-रती’ ला या ३० नोव्हेंबरला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय आणि धुळ्यासारख्या आडवळणाच्या गावातून सुरू झालेला हा कवितेचा शोध आजही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे अखंड आहे. या वाटचालीत पुपांवर अनेक संकटं आली, आर्थिक ओढाताण झाली, मानसिक आघात झालेत मात्र त्याची पर्वा न करता ‘कविता-रती’ ची पताका कायम फडकवत ठेवली आहे. कवितेवर असलेली निष्ठा आणि त्याविषयी असलेले प्रेम यामुळेच प्रा. पाटील या साऱ्या संकटांवर मात करू शकले.
चांगल्या कवितेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतून प्रा. पुरुषोत्तम पाटील ऊर्फ ‘पुपा’ यांनी सुरू केलेल्या ‘ कविता-रती’ ला या ३० नोव्हेंबरला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय आणि धुळ्यासारख्या आडवळणाच्या गावातून सुरू झालेला हा कवितेचा शोध आजही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे अखंड आहे. या वाटचालीत पुपांवर अनेक संकटं आली, आर्थिक ओढाताण झाली, मानसिक आघात झालेत मात्र त्याची पर्वा न करता ‘कविता-रती’ ची पताका कायम फडकवत ठेवली आहे. कवितेवर असलेली निष्ठा आणि त्याविषयी असलेले प्रेम यामुळेच प्रा. पाटील या साऱ्या संकटांवर मात करू शकले. आज ८९ व्या वर्षीही चांगल्या कवितेचा त्यांचा शोध त्याच जोमात सुरू आहे. या तीस वर्षांच्या वाटचालीत अनेक उदयोन्मुख कवींना-समीक्षकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. आजवर प्रसिद्ध झालेल्या ‘कविता-रती’ च्या अंकांतून जवळपास ६०० कवींच्या तीन हजारांपेक्षा जास्त कवितांना प्रकाशझोतात आणले आहे.
‘मी तसं एक लहानसं झाड. पानं-फुलं गळून पडल्यानंतर , फळभाराचा अखेरचा मोसम संपल्यानंतर मी वठून जाईन, हे तर खरंच, जे वैभव, ऊन-पाऊस-वारा-मातीच्या कृपेनं मला मिळालं ते मी माणसांना भरभरून दिलं. आणखीही काही द्यायचं आहे… मी वठल्यावर माझं लाकूड कामाला येईलच. पण त्याचं टेबल, खुर्ची, कपाट वैगेरे काहीही बनवू नका. फक्त एक छानशी खिडकी तयार करा जिच्या चौकटीवर हात ठेवून कुणीतरी व्याकुळ प्रेयसी बाहेर बरसणाऱ्या मेघाकडे डोळाभर तरंगणाऱ्या आसवांतून नजर लावून आपल्या प्रियकराची वाट पाहत असेल… प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या जीवनाचं सार सांगणारी ही कविता. मृत्यू अटळ आहे.जिवंतपणी समाजाला देणे शक्य होते ते देऊन झाले, मात्र मृत्यूनंतरही समाजाला आपला उपयोग व्हावा. आपल्या लाकडापासून बनवलेल्या खिडकीतून आभाळाला गवसणी घालण्याचे बळ माणसाला मिळावे, असा उदात्त विचार मनात येणे आणि तो केवळ मनात न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविणे, हे ज्याला साधते, त्याला कर्मयोगीच म्हणतात. असाच एक कर्मयोगी साहित्याच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या धुळ्यासारख्या शहरात एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे कवितेचा धांडोळा घेतो आहे. पुरुषोत्तम पाटील हे त्यांचे नाव. धुळ्यात आणि त्यांच्या परिचितांत ते ‘पुपा’ याच नावाने ओळखले जातात. नव्या पिढीला त्यांचे नाव किंवा त्यांच्या कविता कदाचित ठाऊकही नसतील, मात्र जुन्या पिढीला आपल्या भावगीतांनी आणि प्रणयरम्य कवितांनी त्यांनी रिझविले एवढे मात्र नक्की. त्यांच्या भावगीतांच्या एचएमव्हीने काढलेल्या रेकॉर्ड्स आता कदाचित त्यांच्याकडेही असतील की नाही याची शंका आहे. त्यांच्या कविता मात्र ‘तळ्यातल्या सावल्या’ आणि ‘परिदान’ या काव्यसंग्रहामुळे आजही आपल्या सोबतीला आहेत.
८९ वर्षांच्या आयुष्यात केवळ चारच पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘तळ्य़ातल्या सावल्या’ आणि ‘परिदान’ हे दोन कवितासंग्रह आणि ‘तुकारामांची काठी’, ‘अमृताच्या ओळी’ हे लेखांचे संग्रह एवढीच त्यांची साहित्यसंपदा. याचा अर्थ त्यांची प्रतिभा मर्यादित होती असे नाही. ते स्वत: एक उत्तम शिक्षक आणि कवितेचे निस्सिम चाहते असल्याने कविता करण्याची क्षमता असलेल्यांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांना घडविण्याचे काम कविता-रतीच्या माध्यमातून केले. ते ३० व्या वर्षीही तेवढ्याच जोमाने आणि जिद्दीने सुरू आहे.
जळगावातल्या नारायण नरसिंह ऊर्फ नानासाहेब फडणीस यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या ‘काव्यरत्नावली’ने घालून दिलेली ४८ वर्षांची परंपरा पुपांनी ‘कविता-रती’ द्वारे जपली. जुन्या-नव्याचा दुवा सांधण्याचे काम ‘कविता-रती’ ने केले. या काळात ‘कविता-रती’ चे कुसुमाग्रज विशेषांक (दोन खंड), बालकवी विशेषांक (दोन खंड), वा. रा. कांत, इंदिरा संत, बा.सी. मर्ढेकर, बा. भ. बोरकर तसेच ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी, काव्यचर्चा असे अनेक विशेषांक प्रकाशित झाले. केवळ कविता आणि कवी यांच्याविषयीची चर्चा एवढ्यापुरते आपले क्षेत्र मर्यादित न ठेवता पुपांनी अनेक नव्या कवींना याद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.
नवोदितांच्या कविता पुपा आजही आस्थेने वाचतात. त्याचे रसग्रहण करण्यात ते मनापासून रमतात. कवितेत रसभंग होणारे जे काही त्यांना आढळते, त्याबाबत कवीशी चर्चा करून मार्गदर्शन करण्याचे काम ते आवडीने करतात. त्यांच्याकडे येणाऱ्या नवोदितांच्या कवितेतील ढोबळ चुका वडिलकीच्या नात्याने संबंधित कवीच्या नजरेस आणून देतात. शब्दांची अचूक निवड आणि योग्य वापर याबाबत ते आग्रही असतात. नामवंत कवींबरोबरच ‘कविता-रती’ ने आजपर्यंत सुमारे ६०० कवींच्या तीन हजारांपेक्षाजास्त कवितांना प्रकाशात आणले आहे. कुसुमाग्रज, इंदिरा संत यांच्यावर पुपांची नितांत भक्ती. कुसुमाग्रजही त्यांना आपले मानत. त्यांचा नियमित पत्रव्यवहारही असे. एकदा पत्र लिहिताना कुसुमाग्रजांना पुपा धुळ्यात राहत असलेल्या रस्त्याचे नाव आठवत नव्हते. त्यांनी पुपांचा पत्ता लिहिताना सरळ ‘कविता रस्ता’ असे लिहून टाकले. त्यानंतर पुपांचे घर असलेला वाडीभोकर रस्ता ‘कवितारस्ता’ म्हणूनच ओळखला जात होता. पुपांना हल्ली ऐकू कमी येते. त्यामुळे संवाद थांबला आहे असे मात्र नाही. प्रश्नकर्त्याने प्रश्न लिहून द्यायचा पुपा त्याचे उत्तर आपल्या खणखणीत आवाजात देतात. त्यांनी जमवलेली ग्रंथसंपदा आणि साहित्यिकांची मांदियाळी हाच सध्या त्यांचा विरंगुळा. पायाच्या दुखापतीने फिरण्यावर बंधन येत असले तरी कवितेचा शोध घेण्याची उमेद मात्र आजही पूर्वीसारखीच कायम आहे. कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण अवतरणे हा त्यांचा आवडीचा आणि संशोधनाचा विषय. ‘अमृताच्या ओळी’ या नावाने कवितेतल्या अशा वैशिष्ट्यपूर्ण अवतरणांवर त्यांनी वर्षभर लेखमाला चालविली. त्या लेखमालेच्याच नावाने प्रसिद्ध झालेले पुस्तक हेच त्यांचे अलीकडील ताजे पुस्तक. पुपांना ‘तुकारामाची काठी’ या स्तंभलेखनाच्या संकलित पुस्तकास अमळनेरच्या चेताश्री प्रकाशनाचा‘मुक्ताई पुरस्कार’ तर ‘कविता-रती’ ला २००३-०४ ची महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाची ‘गौरववृत्ती’ मिळाली. महाबळेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवितेवर अव्याभिचारी निष्ठा असलेल्या पुपांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले होते; ‘मी निराशावादी नाही,जगात कटू, वाईट खूप काही घडत असते, मात्र त्यातून मनाला निराशा येऊ दिली नाही.’ हे केवळ विचारच नव्हते तर तो त्यांनी धर्म मानला. म्हणूनच वादळवाऱ्याला तोंड देत, उनाड पाऊस अंगावर घेत कवितेचे हे झाड सहस्त्रचंद्र दर्शनानंतर शतकपूर्तीच्या वाटेवर दिमाखाने वाटचाल करते आहे. त्यांची कवितेच्या शोधाची धुरा सध्या डॉ. आशुतोष पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
पुपांना त्यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभकामना !!