कविता-रती या कवितेला वाहिलेल्या वाङ्मयीन नियतकालिकाचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने…
खानदेशला वाङ्मयीन परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. क्रांतीची तुतारी फुंकणारे केशवसुत, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बहिणाबाई, बा. सी. मढेर्कर, साने गुरुजी ही या परंपरेतील नावे. या प्रतिभाशाली काव्याविष्काराची जोपासना करणाऱ्या वाङ्मयीन
नियतकालिकांची उपलब्धी हे खानदेशच्या साहित्यविश्वाचे अनोखे वैशिष्ट्य ठरू शकते. नारायण नरसिंह फडणीस यांचे काव्यरत्नावली आणि आर्यावर्त, प्रबोध, खानदेश वैभव, प्रभात, प्रबोध चंदिका या नियतकालिकांचा यासंदर्भात प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या नियतकालिकांचा वारसा चालविणाऱ्या किंबहुना या परंपरेची पताका एकविसाव्या शतकात फडकाविणाऱ्या प्रा.
पुरुषोत्तम पाटील यांच्या ‘कविता-रती’ या द्वैमासिकाने गाठलेली पंचविशी खानदेशातीलच नव्हे, तर राज्याच्या साहित्यविश्वात ऐतिहासिक घटना ठरावी.
‘कविता-रती’ म्हणजे प्रा. पुरुषोत्तम पाटील यांना खानदेशचे ‘संपादक श्री.पु.’ हे बिरुद चिकटण्यास निमित्त ठरले ते नियतकालिक.
सन १९८५च्या नोव्हेंबरमध्ये कविवर्य बा. भ. बोरकरांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सुरू झालेला कविता-रतीचा प्रवास बोरकरांच्या शताब्दीवर्षापर्यंत सुरू आहे. त्यामुळे यंदा कविता-रतीचा दिवाळी अंक ‘9;बा. भ. बोरकर विशेषांक’9; असणार आहे. शासनाचे कोणतेही अनुदान नाही, राजकीय व्यक्ती अथवा शैक्षणिक-सहकारी संस्थांचे भरभक्कम पाठबळ नाही, केवळ वर्गणीदार
आणि मोजके जाहिरातदार यांच्या पाठिंब्यावर सुरू असलेला संसार हे ‘कविता-रती’चे आणखी एक वैशिष्ट्य. प्रा. पाटील यांनी वयाच्या ५८व्या वषीर् व्रतस्थपणे साहित्य शारदेच्या दरबारात रुजू केलेली सेवा, वयाच्या ८३ वषीर् पायांना दुखापत झालेली असताना, श्रवणशक्ती क्षीण झालेली असतानाही सुरू ठेवली आहे. अर्थात, केवळ काव्य आणि काव्यसमीक्षेला वाहिलेले नियतकालिक प्रदीर्घ काळ प्रकाशित करणं, याचं कविता-रती हे काही एकमेव नियतकालिक ठरु शकत नाही. खानदेशातच अशी परंपरा निर्माण करण्याचा बहुमान ‘काव्यरत्नावली’ या सन १८८७ ते १९३५ या कालखंडा प्रकाशित होणाऱ्या द्वैमासिकास दिला जातो. नारायण नरसिंह उर्फ नाना फडणीस यांनी जळगाव येथून प्रकाशित केलेल्या
काव्यरत्नावलीमध्ये साधारण ५० वर्षांच्या कालखंडात सुमारे दोन लाख कविता प्रकाशित केल्याचे सांगितले जाते. काव्यरत्नावलीच्या योगदानाची दखल घेताना आचार्य प्र. के. अत्रे म्हणाले होते, ‘प्राचीन मराठी काव्याचे पुनश्चरण आणि संकीर्तन गोदावरीच्या नि चंदभागेच्या काठी झाले असले तरी आधुनिक मराठी कवितेचे संवर्धन तापी तीरावर झाले आहे’. खानदेशचं लेणे ठरावी अशी ही परंपरा १०० वर्षांनंतर पांझरेच्या तीरावर पुनरुज्जीवित व्हावी हा योगयोगदेखील भारावून टाकणारा आहे.
‘कविता-रती’चा गाडा हाकणारे पुरुषोत्तम पाटील (धुळेकरांचे पुपाजी) स्वत: जातिवंत कवी आहेत. ‘अनुष्टुभ’ या नियतकालिकाच्या जडणघडणीच्या काळातील संपादनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. काव्यनिर्मिती केवळ पुपाजींचा छंद आहे, असे नव्हे तर, तो त्यांच्या जगण्याचा श्वास आहे, ऑक्सिजन आहे. तरुण पुत्राचे दुदैर्वी निधन, या घटनेचा आघात सहन न झाल्यामुळे पत्नीवर झालेला मानसिक परिणाम, प्राचार्य तसेच प्राध्यापक म्हणून काम करीत असताना आलेले कटू अनुभव या लागोपाठच्या आघातांमुळे पुपाजी कोलमडले नाहीत. या काळात त्यांना विशेष बळ मिळाले ते बा. भ. बोरकर आणि कुसुमाग्रजांच्या सहवासात. पुण्याला र्फग्युसन महाविद्यालयात बी. ए. करीत असताना पुपाजी बोरकरांच्या संपर्कात आले. त्यावेळी पुपाजींच्या कविता सत्यकथेतून प्रसिद्ध होत. शिवाय सुंदर हस्ताक्षराची देणगी होतीच. लेखनिक म्हणून काम करण्यासाठी बोरकरांनी पुपाजींना स्वत:च्या घरीच ठेवून घेतलं. त्यांच्या सहवासात पुपाजींच्या प्रतिभेचा वेलू बहरला. त्यांच्या काव्यात हमखास आढळते ते स्त्री-पुरुष प्रेमाचे, शृंगाराचे आणि विरहाचे चित्रण. खानदेशी जुन्या परंपरेतील स्त्रीचे दर्शन त्यांच्या काव्यात होते. शिवाय माथ्यावरचा पदर, थरारे, काचोळी, उसासे, कंकण, मेंदी, पेटल्या हाताची धग, लाजलाजरे सावरवस्त्र असे काळजात धकधक निर्माण करणारे वर्णनही आढळते.
ज्ञानप्रकाश, माणूस, सत्यकथा, छंद, उगवाई, आलोचना यासारख्या दजेर्दार नियतकालिकांचा साहित्य क्षितिजावरून अस्त झाला. अशी शोकांतिका कविता-रतीची होऊ नये असं वाटणारे अनेक मान्यवर साहित्यिक, जिज्ञासू वाचक आणि चाहते यांची मायेची पाखर पुपाजींना लाभली. त्यामुळेच पुरुषोत्तम पाटलांना ‘कविता-रती’; जोपासणे शक्य झाले. २५ वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेले
कुसुमाग्रज (तीन खंड), वा. रा. कांत, इंदिरा संत, संजीवनी मराठे, बालकवी (दोन खंड), विंदा करंदीकर, बा. सी. मढेर्कर, प्रा. रा. ग. जाधव, प्राचार्य म. सु. पाटील इत्यादी विशेषांक या कवींच्या काव्याविषयी अधिक डोळस आणि अभिनव दृष्टी प्रदान करणारे आहेत. याव्यतिरिक्त ‘ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी विशेषांक’ आणि ‘काव्यचर्चा विशेषांक’ हे विशेषांकही कविता-रतीतील काव्यसमीक्षेच्या
वेगळेपणाची साक्ष देणारे आहेत. त्यामुळे या विशेषांकांना सांस्कृतिक ठेव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तळ्यातल्या साउल्या, परिदान इत्यादी कसदार काव्यसंग्रह पुपाजींच्या नावावर आहेत. त्यांच्या या साहित्यसेवेची दखल कविवर्य केशवसुत पुरस्कार आणि बालकवि पुरस्कार प्रदान करण्यात येऊन घेण्यात आली आहे. मात्र ऊठसूठ मराठी प्रेमाचे भरते येणाऱ्या मंडळींनी इंग्रजीऐवजी मराठी पाट्यांसाठी आटापिटा करीत असताना कविता-रतीसारखी वाङ्मयीन नियतकालिके जगविण्यासाठी हातभार लावला तर मराठी अमर राहण्याची पुण्याई त्यांच्या नावावर जमा होऊ शकते. विद्यापीठातील मराठीचे तरुण अध्यापक आणि कवि आशुतोष पाटील यांना पीएच.डी. संशोधनासाठी ‘कविता-रती’वर लक्ष केंदित करणे महत्त्वाचे वाटले. काव्यक्षेत्राच्या संक्रमणकाळात कवितेचा सच्चा सूर लावून मराठी कवी, काव्यसमीक्षक, काव्यरसिक, काव्याभ्यासक, काव्यवाचक अशा सगळ्यांनाच चैतन्यमय करून त्यांची काव्याभिरुची अधिक उन्नत करणाऱ्या कविता-रतीचे कार्य मराठी काव्याच्या आणि वाङ्मयीन नियतकालिकांच्यादृष्टीने ऐतिहास स्वरूपाचे आहे, हे प्रा. आशुतोष पाटील यांचेच नव्हे तर खानदेशवासींचे प्रातिनिधिक मत आहे. विशेष म्हणजे यावर सर्वांचे एकमत आहे. (प्रा. पुरुषोत्तम पाटील ०२५६२-२२०१७३, ९३७२०२०१७३)
(महाराष्ट्र टाइम्स_२९ ऑक्टोबर २०१० वरून साभार)