मराठी वाङ्मयीन नियतकालिकाचा संपादक म्हणून पुरुषोत्तम पाटील यांची ध्येयनिष्ठा आणि कर्तृत्व पाहता, त्यांना ‘अभिरुचि’चे पु. आ. चित्रे, ‘सत्यकथा-मौज’चे श्री. पु. भागवत यांच्या परंपरेतील शेवटचे ‘सीझर’ म्हणावेसे वाटते; पण त्यांच्यासाठी त्यांना आवडेल अशी उपाधी होईल ‘कविता-मदन’ कारण ‘कविता-रती’ त्यांचे सर्वस्व होते.
पुरुषोत्तम पाटील मला पहिल्यांदा भेटले ते बार्शीच्या साहित्य संमेलनात. माझ्यासारखा नवोदित कवी, त्यांच्यासारख्या ख्यातकीर्त कवीच्या खिसगणतीत असायचे काही कारण नव्हते. कुणी तरी आमची ओळख करून दिली. त्यांचे डोळे जाड चष्म्यातून चमकले. ते आनंदाने म्हणाले, ‘होड्यावाले जोगळेकर? वा वा! बरा सापडला कवी!’ त्यांनी लगेच, ते नव्याने सुरू करणार असलेल्या ‘कविता-रती’चे पावतीपुस्तक काढले आणि मला वर्गणीदार करून टाकले. तेव्हापासून मी ‘कविता-रती’चा नियमित वर्गणीदार आणि वाचक झालो. ‘कविता-रती’चा कवी व्हायला मात्र खूप काळ लागला.
एकदा मुंबईच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अतिथीगृहात ते मला भेटले. मी ‘अभिरुचि’त ‘खडा मारायचा झाला तर’ हे साहित्यिक घडामोडींची खिल्ली उडवणारे सदर लिहितो, हे कळल्यावर ते आनंदाश्चर्याने म्हणाले, ‘अरे वा! आम्हाला वाटायचे, की ते स्वत: बाबूरावच लिहितात.’ मी त्या वेळी ‘माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा’ची संहिता लिहीत होतो. ती त्यांनी मन लावून वाचली. म्हणाले, ‘हे एक महत्त्वाचे पुस्तक होईल. याला चित्रे मात्र वसंत सरवट्यांचीच हवीत.’
‘सत्यकथा’ मासिक बंद झाले, तेव्हा मी त्याविषयी ‘ज्यूलियस सीझर’ नावाची दीर्घ कविता लिहिली. ही वाङ्मयीत नियतकालिकातच यायला हवी, असे वाटल्याने मी ती ‘कविता-रती’कडे पाठवली. बऱ्याच दिवसांनी पुरुषोत्तम पाटलांचे पत्र आले. त्यात त्यांनी ती गद्यप्राय वाटल्याने नाकारल्याचे कळवले. वास्तविक, त्यातील गद्यप्राय ओळी हेतुपुरस्सर होत्या, ‘ज्यूलियस सीझर’ नाटकातल्या ‘सत्यकथे’ला लागू पडतील अशा. कवितेतील सीझर कोण आहे याचा प्रत्यक्ष उल्लेख नसल्याने कदाचित ते समजले
नसावे; पण मी त्याचा खुलासा करायला गेलो नाही. नंतर माझ्याकडून ‘कविता-रती’कडे कविता पाठवल्या गेल्या नव्हत्या. पुरुषोत्तम पाटलांचे मात्र माझ्या इतरत्र येणाऱ्या कवितांकडे लक्ष होते. रवींद्र लाखे संपादित ‘संवाद’मध्ये माझी ‘रतिवर्णन’ ही कविता प्रसिद्ध झाली आणि पाटलांचे मला खुशीपत्र आले. या रतीच्या दर्शनाने आपण मदनच झालो आहोत, असे वाटल्याचे त्यांनी कळवले. रतीच्या शारीर वर्णनापेक्षा त्यांना भावले होते ते ‘तिच्या पायाच्या नखांवर अजून टिकून असलेले आदिवासी रंग – तिच्या बालपणाचे’ या कवितेत उल्लेखलेल्या रतीच्या कपाळावरच्या लालम्लाल टिळ्याच्या संदर्भात त्यांनी, ‘तुमच्या नावाचा टिळा ‘कविता-रती’;ला कधी लागणार?’ असा प्रश्न केला. मी ‘कविता-रती’कडे कविता पाठवू लागलो. त्यांची पत्रे येऊ लागली आणि पुरुषोत्तम पाटील इतर सर्व कवींप्रमाणे माझ्यासाठीही ‘पुपाजी’ झाले.
पुण्याच्या मसापने पिंपरीत भरवलेल्या विभागीय साहित्य संमेलनात पुपाजी भेटले, तेव्हा मी नुकत्याच लिहिलेल्या कवितांचा गठ्ठाच त्यांच्या हवाली केला. त्या वाचून त्यांनी, ‘प्रतिभेच्या या विलक्षण बहराने चकित झालो,’ असे कळवले. त्यातल्या काही कविता पुपाजींनी ‘कविता-रती’साठी ठेवून घेतल्या आणि इतर कविता इतरत्र पाठवायला हरकत नाही, असे कळवले. या कविता ‘कविता-रती’च्या अंकांतून येऊ लागल्या; पण एक गडबड झाली. इतरत्र प्रकाशित झालेलीच एक कविता पुन्हा तेथे छापली गेली. याचा खुलासा करणारे पत्र ‘कविता-रती’त छापण्याची मी पुपाजींना विनंती केली. ती त्यांनी साफ धुडकावून लावली. असे पत्र लिहून तुम्ही तुमच्या कवितेकडे मुद्दाम लक्ष वेधायचा प्रयत्न करीत आहात, असे इतरांना वाटेल, असे त्यांचे म्हणणे होते. आपल्या कवीची कवितेबाहेरील प्रतिमाही पुपाजी कटाक्षाने जपत असत. तपशीलाच्या चुका मात्र ते सुधारत असत.
वेगळी मांडणी असलेल्या कविता, त्यासाठी कष्ट घेऊन मुद्रित करण्याचे लाड ‘कविता-रती’तच पुरवले जात. माझ्या काही कवितांतील शृंगारिक उल्लेख, कवी बी, पु. शि. रेगे किंवा स्वत: पुरुषोत्तम पाटील यांच्यावरही ताण करणारे आहेत, असे पुपाजींना वाटे. ते त्यांना आवडतही असत आणि त्यावर कधी कधी व्रात्य टिप्पणीही करीत. त्याला ते ‘व्रात्यस्तोम’ विधी म्हणत; मात्र हे पत्र खासगी आहे. प्रसिद्धीसाठी नाही, अशी सावध सूचनाही करीत. ‘कविता-रती’च्या संपादकांनी असे काही जाहीरपणे म्हणणे त्यांना उचित वाटत नसे. माझ्या गंभीर कवितांइतकेच माझ्या तिरकस कवितांचेही पुपाजी चाहते होते. माझ्या अशा कविता प्रामुख्याने ‘कविता-रती’तच प्रसिद्ध झाल्या आहेत. या कवितांनी अनेकांना ठसका लागतो, असेही पुपाजींनी कळवले होते. ‘कविता-रती’ तपपूर्ती विशेषांकासाठी मी माझी ‘बडबड गित्र’ ही बडबडगीतासारखी नॉन्सेन्स (?) कविता पाठवली. पुपाजींनी ती शेषांग म्हणून छापली. या कवितेत ‘त्र’ची निरर्थक (?) यमके साधताना शब्दांची मोडतोडही केली होती. त्यातल्या ‘मुलखाचं भित्रं। अरुण म्हात्र’ या ओळीमुळे अरुण म्हात्रेसारखा आपला कवीमित्र दुरावला, अशी पुपाजींना विनाकारण रुखरुख लागली. खरे तर, असे असायचे कारण नव्हते. ही कविता मी अरुणसमोरही वाचली होती आणि तिला अरुणने हसून दाद दिली होती; पण कवीचे कोमल मन अशा उल्लेखामुळे दुखावले गेले की काय, असा हळवा भाव पुपाजींपाशी होता. याच भावनेने त्यांनी माझ्या काही कवितांतील ओळींना आपल्या संपादकीय अधिकारात कात्री लावली होती. ‘पुस्तक नंतर वाचा’ या कवितेत कवी आणि साहित्यव्यवहार
यांना कोपरखळ्या दिल्या आहेत. त्यातली एक द्विपदी पुपाजींनी वगळली. ज्येष्ठ लेखकाच्या भावना चुकूनही दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी पुपाजी दक्ष असत.
‘अंतर्नाद’मध्ये मी लिहीत असलेल्या ‘अगा कवितांनो’, ‘अगा कवींनो’, ‘9;पुन्हा कविता’या कविताविषयक लेखमाला वाचून पुपाजींनी ‘तुम्ही किती खोलवर जाऊन काव्याच्या गाभ्याशी भिडता,’ असे पत्रातून कळवले. मी ‘कविता-रती’साठीही गद्यलेखन करावे, असा आग्रह धरला. ‘अगा कवींनो’ या लेखमालेत समकालीन कवींची दखल घेताना मी द. भा. धामणस्करांवर लेख लिहिल्यानंतर, पुपाजींनी आपल्या पत्रात ते स्वत: धामणस्करांचे समवयस्क असल्याचे निदर्शनास आणून दिले; पण पुपाजींच्या बहुपैलू कवितेला कवेत घेणे मला जमले नव्हते.
मी पाठवलेली एखादी कविता पुपाजींना रुचली नाही, तर ते ‘कविता-रती’साठी नाकारीतच; पण ती इतरत्रही कुठे देऊ नका, अशी आज्ञा देत. ‘कविता-रती’च्या कवीची कुठेही येणारी कविता चांगलीच असायला हवी, असे त्यांना मन:पूर्वक वाटत असे. कवितेची निवड करताना ते स्वत:ची अभिरुची आणि काव्यमूल्ये यांनाच प्रमाण मानत. आपली काव्यनिष्ठा जपणे हा त्यांचा धर्म होता. बोरकर हे पुपाजींचे दैवतच
होते; पण बोरकरांच्या एका संग्रहाचे संकलन करताना त्यांनी त्यातील काही कविता बाजूला ठेवण्याची विनंती केली आणि बोरकरांनीही ती मानली होती.
‘कविता-रती’ सुरू केल्यापासून पुपाजींनी तिला वाहूनच घेतले होते. त्यामुळे त्यांचे काव्यलेखनही थांबले. ते जसे कवीची पाठ थोपटत, कान पकडत, तसे मार्गदर्शनही करीत. त्यासाठी ते एखाद्या कवीचे लक्ष दुसऱ्या कवीच्या कवितांकडेही वेधत असत.
सुरुवातीच्या काळात संतोष पद्माकर पवार विडंबन कवितेचा मार्ग धुंडाळत असताना, पुपाजींनी त्यांना माझ्या विडंबन कवितांकडे वस्तुपाठ म्हणून पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक कवीचे ते फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड होते.
‘कविता-रती’कडे मी पाठवलेली पहिली कविता होती ‘ज्यूलियस सीझर.’ मराठी वाङ्मयीन नियतकालिकाचा संपादक म्हणून पुपाजींची ध्येयनिष्ठा आणि कर्तृत्व पाहता, त्यांना ‘अभिरुचि’चे पु. आ. चित्रे, ‘सत्यकथा-मौज’चे श्री. पु. भागवत यांच्या परंपरेतील शेवटचे ‘सीझर’ म्हणावेसे वाटते; पण त्यांच्यासाठी त्यांना आवडेल अशी उपाधी होईल ‘कविता-मदन’; कारण ‘कविता-रती’त्यांचे सर्वस्व होते. या लेखाबरोबर माझे ‘जीवीचे जिवलग’ सदर संपत आहे. या निमित्ताने या मोठ्यांनी मला दिलेल्या निरपेक्ष प्रेमाचे कृतज्ञ स्मरण करता आले, हा आनंद मोठा आहे. शेवटी,
माझ्यासारख्या
घेणाऱ्याने घेता घेता
देणाऱ्याचे हात घ्यावेत
एवढीच प्रार्थना!