‘कविता-रती’ची 25 वर्षाची वाटचाल कोणतेही संकट न येता झाली, असे म्हणता येणार नाही. चांगल्या कवितेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या या नियतकालिकाला पु.ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्यासारख्या रसिकांनी आर्थिक मदत केलीच; शिवाय अनेक कवींना आपल्याला मिळालेल्या काव्यविषयक पुरस्कारांची रक्कम कवितारतीसाठी
कृतज्ञतेच्या भावनेतून पाठवून दिली. ऐन तारुण्यात असलेल्या मुलाच्या मृत्यूने आलेली उदासीनता आणि या घटनेमुळे पत्नीवर झालेला मानसिक आघात या सा-या भावनिक गुंत्यातून बाहेर पडण्यात कवितारतीनेच त्यांना बळ दिले. म्हणूनच पुपांचा चांगल्या कवितांचा शोध अजूनही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे सुरूच आहे.

‘मी एक लहानसं झाड आहे,
फळभाराचा अखेरचा मोसम
संपल्यानंतर वठून जाईन
त्याची एक खिडकी बनवा’
माणसाचा मृत्यू अटळ आहे. जिवंतपणी समाजाला देणे शक्य होते ते देऊन झाले, मात्र मृत्यूनंतरीही समाजाला आपला उपयोग व्हावा. आपल्या लाकडापासून बनवलेल्या खिडकीतून आभाळाला गवसणी घालण्याचे बळ माणसाला मिळावे, असा उदात्त विचार मनात येणे आणि तो केवळ मनात न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविणे, हे ज्याला साधते, त्याला कर्मयोगीच म्हणतात. असाच एक कर्मयोगी साहित्याच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या धुळय़ासारख्या शहरात एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे कवितेचा धांडोळा घेतो आहे. पुरुषोत्तम पाटील हे त्यांचे नाव. धुळय़ात आणि त्यांच्या परिचितांत ते ‘पुपा’ याच नावाने ओळखले जातात. नव्या पिढीली त्यांचे नाव किंवा त्यांच्या कविता कदाचित ठाऊकही नसतील, मात्र जुन्या पिढीला आपल्या भावगितांनी आणि प्रणयरम्य कवितांनी त्यांनी एके काळी रिझविले एवढे मात्र नक्की. त्यांच्या भावगीतांच्या एचएमव्हीने काढलेल्या रेकॉर्ड्स आता कदाचित त्यांच्याकडेही असतील की नाही याची शंका आहे. त्यांच्या कविता मात्र ‘तळय़ातल्या सावल्या’ आणि ‘परिदान’ या काव्यसंग्रहामुळे आजही आपल्याला सोबतीला आहेत.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुपा पुण्यात आणि तेही फर्गसनसारख्या नावाजलेल्या कॉलेजात. त्या काळात
साहित्य संस्कृतीचे माहेरघर अशी पुण्याची ओळख रूढ झालेली होती. पुपांना कवितेची मुळातच मनापासून आवड. त्यांचे हस्ताक्षर तर मोत्याच्या दाण्यासारखे. बोरकर त्या काळात पुण्यातच वास्तव्यास होते. त्यांना लेखनिकाची गरज होती. पुपांनाअसलेली कवितेची आवड, साहित्याचा अभ्यास आणि सुंदर हस्ताक्षर या सा-या बाबी जुळून आल्याने ते बोरकरांचे लेखनिक झाले. बोरकरांनी त्यांना घरातला एक सदस्य अशीच वागणूक दिली आणि त्यांना आपल्या घरीच ठेऊन घेतले. तब्बल तीन वर्षे ते बोरकरांच्या सहवासात होते. बोरकरांच्या सहवासात त्यांची कविता आणि कवितांविषयीचे प्रेम अधिक प्रगल्भ आणि डोळस झाले. बोरकरांप्रमाणेच पुपाही सौंदर्यवादी. ग्रामीण स्त्रीचा साजशृंगार, स्त्री-पुरुषांमधले आकर्षण आणि प्रणयभावना यांचे चित्रण त्यांच्या कवितांतून येते.

84 वर्षाच्या आयुष्यात केवळ चारच पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.‘तळय़ातल्या  सावल्या’ आणि ‘परिदान’ हे दोन कवितासंग्रह आणि ‘तुकारामांची काठी’, ‘अमृताच्या ओळी’ हे लेखांचे संग्रह एवढीच त्यांची साहित्य संपदा. याचा अर्थ त्यांची प्रतिभा मर्यादित होती असे नाही. ते स्वत: एक उत्तम शिक्षक आणि कवितेचे निस्सिम चाहते असल्याने कविता करण्याची क्षमता असलेल्यांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांना घडविण्याचे काम कवितारतीच्या माध्यमातून केले. ते 25 वर्षानंतरही तेवढय़ाच जोमाने आणि जिद्दीने सुरू आहे.

ज्यांनी आपल्याला साहित्याची नवी दृष्टी दिली आणि दिशा दाखविली, त्या कविवर्य बोरकरांच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुपांनी ‘कविता-रती’ हे केवळ कवितांना समर्पित केलेले द्वैमासिक सुरू केले. 30 नोव्हेंबर 1985 रोजी प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते कविता-रतीच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. परवाच्या 30 नोव्हेंबरला कविता-रती 25 वर्षाचे झाले. गेली 25 वर्षे केवळ एकाच व्यक्तीने असंख्य अडचणींवर मात करत, कविताविषयक नियतकालिक सुरू ठेवावे, हा एक विक्रमच म्हणायला हवा. जुन्या-नव्या कवींच्या कविता, कवितांची समीक्षा, महत्त्वपूर्ण कवींसंबंधी लेख, त्यांची छायाचित्रांसह माहिती, वैशिष्टय़पूर्ण अवतरणे असा मजकूर असलेले आणि फक्त कवी आणि कविता यांनाच पूर्णत: वाहिलेल्या या नियतकालिकाने आज
साहित्यक्षेत्रात मानाचे स्थान निर्माण केले आहे. जळगावातल्या नारायण नरसिंह ऊर्फ नानासाहेब फडणीस यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणा-या काव्यरत्नावलीने घालून दिलेली 48 वर्षाची परंपरा पुपांनी कविता-रतीद्वारे जपली आहे. जुन्या-नव्याचा दुवा सांधण्याचे काम कविता-रतीने केले आहे. या काळात कविता-रतीचे कुसुमाग्रज विषेशांक(दोन खंड), बालकवी विशेषांक(दोन खंड), वा. रा. कांत इंदिरा संत, तसेच ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी, काव्यचर्चा असे अनेक विशेषांक प्रकाशित झाले. केवळ कविता आणि कवी यांच्याविषयीची चर्चा एवढय़ापुरते आपले क्षेत्र मर्यादित न ठेवता पुपांनी अनेक नव्या कवींना कविता-रतीद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. नवोदितांच्या कविता पुपा आजही आस्थेने वाचतात. त्याचे रसग्रहण करण्यात ते मनापासून रमतात. कवितेत रसभंग होणारे जे काही त्यांना आढळते, त्याबाबत कवीशी चर्चा करून मार्गदर्शन करण्याचे
काम ते आवडीने करतात. त्यांच्याकडे येणा-या नवोदितांच्या कविततील ढोबळ चुका वडिलकीच्या नात्याने संबंधित कवीच्या नजरेस आणून देतात. शब्दांची अचूक निवड आणि योग्य वापर यावर ते आग्रही असतात. नामवंत कवींबरोबरच कविता-रतीने आजपर्यंत 575 कवींच्या सुमारे 2800-2900 कवितांना प्रकाशात आणले आहे. कुसुमाग्रज, इंदिरा संत यांच्यावर पुपांची नितांत भक्ती. कुसुमाग्रजही त्यांना आपले मानत. त्यांचा नियमित पत्रव्यवहारही असे. एकदा पत्र लिहिताना कुसुमाग्रजांना पुपा धुळय़ात राहात असलेल्या रस्त्याचे नाव आठवत नव्हते. त्यांनी पुपांचा पत्ता लिहिताना सरळ ‘कविता रस्ता’ असे लिहून टाकले. तेव्हापासून पुपांचे घर असलेला वाडीभोकर रस्ता ‘कविता रस्ता’ म्हणूनच ओळखला जात होता. नंतर त्याला एका शिक्षणतज्ज्ञाचे नाव देण्यातआले हा भाग निराळा. चांगल्या कवितेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या या नियतकालिकाला पुल देशपांडे, सुनीताबाई यांच्यासारख्या रसिकांनी आर्थिक मदत केलीच; शिवाय अनेक कवींनी आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम कविता-रतीसाठी दिली. ऐन तारुण्यात असलेल्या मुलाच्या मृत्यूने आलेली उदासीनता आणि या घटनेमुळे पत्नीवर झालेला मानसिक आघात या सा-या भावनिक गुंत्यातून बाहेर पडण्यात कविता-रतीनेच त्यांना बळ दिले. त्यांना हल्ली ऐकू कमी येते. पायाच्या दुखापतीने फिरण्यावर बंधन येत असले तरी कवितेचा शोध पूर्वीच्याच उमेदीने सुरू आहे. कवितेतील वैशिष्टय़पूर्ण अवतरणे हा त्यांचा ‘वीकपॉइंट’. त्यामुळेच पुण्याच्या ‘रविवारच्या केसरी’त ‘अमृताच्या
ओळी’ या नावाने कवितेतल्या अशा वैशिष्टय़पूर्ण अवतरणांवर त्यांनी वर्षभर लेखमाला चालविली. त्या
लेखमालेच्याच नावाने प्रसिद्ध झालेले पुस्तक हेच त्यांचे अलीकडील ताजे पुस्तक.

पुपांना ‘तुकारामाची काठी’ या स्तंभलेखनाच्या संकलित पुस्तकास अमळणेरच्या चेताश्री प्रकाशनाचा ‘मुक्ताई पुरस्कार’ तर ‘कविता-रती’ला 2003-04 ची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची ‘गौरववृत्ती’ मिळाली. महाबळेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवितेवर अव्याभिचारी निष्ठा असलेल्या पुपांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले होते; ‘मी निराशावादी नाही, जगात कटू, वाईट खूप काही घडत असते, मात्र त्यातून मनाला निराशा येऊ दिली नाही.’ हे केवळ विचारच नव्हते तर तो त्यांनी धर्म मानला. म्हणूनच वादळवा-याला तोंड देत, उनाड पाऊस अंगावर घेत कवितेचे हे झाड सहस्त्रचंद्र दर्शनानंतरही ताठ मानेने उभे आहे.

(दै.प्रहार_ दि.४ डिसेंबर २०१० वरून साभार)